Return

महाराष्ट्रातील अष्टविनायक गणेश देवस्थाने - अष्टविनायकयात्रा

40 0
महाराष्ट्रातील अष्टविनायक गणेश देवस्थाने - अष्टविनायकयात्रा

 गणपती किंवा गणेश भारतात सर्वाधिक पूजनीय दैवत आहे. पवित्र अष्टविनायक देवस्थानांमुळे महाराष्ट्राला एक विशिष्ट वलय प्राप्त झाले आहे. “अष्टविनायक” या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे “आठ गणपती”. ही आठ मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी स्थित आहेत, आणि अशी मान्यता आहे की हे सगळे गणपती “स्वयंभू” अर्थात स्वतः उत्पन्न झाले आहेत. आणि या सर्व गणेशमूर्ती “जागृत” आहेत, अर्थात त्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करतात. यातील प्रत्येक गणपती वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात आणि प्रत्येक नावाबरोबर एक कथा निगडीत आहे.

अष्टविनायकांची नावे आणि ठिकाणे

  • चिंतामणी
  • मोरेश्वर
  • गिरिजात्मज
  • महागणपती
  • सिद्धिविनायक
  • विघ्नेश्वर
  • वरदविनायक
  • बल्लाळेश्वर

ही आठ देवळे महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत- पुणे, रायगड, आणि अहमदनगर.

सर्वसाधारणपणे अष्टविनायक यात्रे चे क्रम असा असतो:

  • मोरेश्वर – मोरगाव
  • सिद्धिविनायक – सिद्धटेक
  • बल्लाळेश्वर – पाली
  • वरदविनायक – महाड
  • चिंतामणी – थेऊर
  • गिरिजात्मज – लेण्याद्री
  • विघ्नेश्वर – ओझर
  • महागणपती -रांजणगाव

अशी परंपरा आहे की अष्टविनायकयात्रा मोरगाव येथील मोरेश्वर मंदिरापासून सुरु केली जाते. उर्वरित सगळ्या मंदिरांचे दर्शन झाल्यानंतर पुन्हा मोरगाव येथे दर्शन करून ही यात्रा संपन्न होते.

अष्टविनायक मंदिरांबद्दल माहिती जाणून घेऊ या.

मोरेश्वर देवस्थान

अष्टविनायकांमध्ये सगळ्यात पहिले मंदिर आहे मोरेश्वर. अष्टविनायक यात्रेची सुरुवात येथूनच होते. मोरेश्वरदेवस्थान पुण्यापासून ५५ किलोमीटर लांब आहे. मंदिरात जाणारा रस्ता उत्तम आहे.

मंदिर ५० फुट उंचीचे असून अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या चारही दिशांना जाण्यासाठी द्वार आहेत पण मुख्य द्वार उत्तरमुखी आहे.

मंदिराच्या आवारात दोन उंच दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या बरोबर समोर एक मोठी मूषक प्रतिमा आहे. तसेच मंदिराच्या बाहेर गणेश प्रतिमेच्या सम्मुख एक काळ्या पाषाणातील मोठा नंदी आहे.ही एक असामान्य गोष्ट आहे. नंदी सामान्यतः शंकराच्या देवळासमोर असतो.

मंदिरात दिवसातून तीन वेळा सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता, आणि संध्याकाळी ८ वाजता पूजा-अर्चा केली जाते. विशेष पर्वकाळात गणेश जयंती (माघ शुक्ल चतुर्थी), गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी), आणि प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला मंदिरात खूप गर्दी असते. जगभरातून भाविक या काळात दर्शनासाठी येथे येतात.

सोमवती अमावस्या आणि विजयादशमी सणांना येथे उत्सव साजरा केला जातो.

सिद्धिविनायक देवस्थान

सिद्धिविनायक किंवा सिद्धटेक गाव अहमदनगर जिल्ह्यात्तील कर्जत तालुक्यात आहे. हे मंदिर अष्टविनायक यात्रेतील दुसरे मंदिर आहे. याला सिद्धिविनायक या नावाने संबोधिले जाते कारण येथे भगवान विष्णू यांना सिद्धी प्राप्त झाली होती. अशी ही मान्यता आहे की भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक म्हंटले जाते.

सिद्धिविनायक मंदिर पुण्यापासून २०० किलोमीटर अंतरावर भीमा नदी च्या काठी आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे जिला सिद्धटेक म्हंटले जाते. भाविक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी या टेकडीला सात प्रदक्षिणा करतात.

मंदिरातील मूर्ती तीन फुट उंचीची असून उजव्या सोंडेची मूर्ती असलेले अष्टविनायकांतील हे एकमात्र मंदिर आहे. हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

१८व्या शतकात देवी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून सध्याचे मंदिर उभारले. मंदिर परिसरात असलेल्या इतर वास्तू विविध लोकांनी नंतरच्या काळात उभारल्या. हे उत्तराभिमुखी मंदिर काळ्या पाषाणातील आहे. मंदिराचे गर्भगृह १० फुट रुंद आणि १५ फुट उंच आहे.

मंदिरात साजरे होणारे मुख्य उत्सव आहेत- भाद्रपदातील गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेश जयंती.

बल्लाळेश्वर देवस्थान

बल्लाळेश्वर देवस्थान महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात रोहा या ठिकाणाहून २८ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अंबा नदी आणि प्रसिद्ध सरसगड किल्ल्याच्या मध्ये स्थित आहे. पुण्यापासून बल्लाळेश्वर मंदिराचे अंतर २०० किलोमीटर आहे.

मूळ लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार करून १७८० साली सध्याचे दगडी मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि त्याची बांधणी अश्या प्रकारे केली आहे की सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. ही घंटा पहिले बाजीराव यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर अर्पण केली होती.

मंदिरात साजरे होणारे दोन मुख्य उत्सव आहेत भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेश जयंती. या दरम्यान धार्मिक उत्सवांची रेलचेल असते.

वरदविनायक देवस्थान

वरदविनायक मंदिरातील मूर्ती देखील स्वयंभू अर्थात आपोआप निर्माण झालेली आहे. ही मूर्ती १६९० साली मंदिराजवळील तळ्यात सापडली होती. स्थापन केलेल्या जागेवर सुभेदार रामजी महावेव बिवलकर यांनी १७२५ साली मंदिराची उभारणी केली.

मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या चारही दिशांना चार हत्तींची स्थापना केली आहे. या मंदिरात १८९२ पासून अखंडदीप प्रज्ज्वलित आहे.

जगभरातून भाविक वरदविनायकाच्या दर्शनाला येतात. या मंदिरात भाविकांना गर्भगृहात जावून पूजा-अर्चा करण्याची परवानगी आहे.

वरदविनायक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील महाड येथे आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सगळ्या मोठ्या शहरांना रस्ता मार्गे जोडलेले आहे.

तसे तर मंदिरात वर्षभरच गर्दी असते, पण माघ महिन्यात येथे भाविकांची संख्या वाढते. माघ महिन्यातील चतुर्थी ला येथे गर्दीचा महापूर असतो.

चिंतामणी देवस्थान

पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेले श्री चिंतामणी देवस्थान अष्टविनायकांतील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध देवस्थान आहे. हे मंदिर फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. सध्या असलेले मंदिर हे मोरया गोसावी यांनी बांधले.

थोरले माधवराव पेशवे चिंतामणी गणेशाचे अनन्य भक्त होते. ते या मंदिरात नेहमी दर्शनाला येत असत. आपल्या अंतकाळी त्यांनी या मंदिरातच वास्तव्य केले होते आणि येथेच त्यांचे निधन झाले.

हे मंदिर अतिशय विशाल असून दगडी बांधणीचे आहे. मंदिराच्या आवारात थोरले माधवराव यांनी लाकडी सभामंडप बांधले.

मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून मस्तकाशिवाय शरीराचे अवयव ठळकरीत्या दिसत नाहीत. मूर्तीच्या नेत्रांमध्ये हिरे आहेत.

चिंतामणी देवस्थानात तीन उत्सव मुख्य आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी. या काळात येथे जत्रा भरते.

माघ महिन्यात भगवान गणेशाचा जन्मदिनी गणेश जयंती साजरी केली जाते.

कार्तिक महिन्याच्या अष्टमी ला थोरले माधवराव आणि सती रमाबाई यांच्या स्मरणार्थ रमा-माधव पुण्योत्सव साजरा केला जातो.

गिरिजात्मज देवस्थान

गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री या नावाने देखील ओळखले जाते. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात गणेश लेण्यांमध्ये स्थित आहे. पुण्यापासून या मंदिराचे अंतर ९५ किलोमीटर आहे.

या लेण्यांमध्ये एकूण ३० गुंफा आहेत. गिरिजात्मजमंदिर हे ७व्या गुंफेत स्थित आहे. या गुंफा सपाटीपासून १०० फुट उंचीवर आहेत. हे मंदिर अंदाजे १७०० वर्षे जुने आहे. भाविकांना गणपतीच्या दर्शनासाठी ३०० पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर शिल्प आणि स्थापत्याच्या दृष्टीने विलक्षण आहे. हे अतिशय साधे आणि प्राकृतिक असे आहे.

भाद्रपद आणि माघ महिन्यात मंदिरात उत्सव साजरा केला जातो. त्याशिवाय दर महिन्याच्या चतुर्थीला मंदिर शृंगारिले जाते आणि विशेष पूजा-अर्चा केली जाते.

विघ्नेश्वर देवस्थान

ओझर येथील विघ्नेश्वर देवस्थान पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर पुणे जिल्ह्यातील जुनार तालुक्यात कुकडी नदीच्या काठी हे मंदिर आहे.

पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या कळसाला सोन्याने मढविले.

मंदिराच्या पूर्ण परिसराच्या चहुबाजूला भिंत आहे आणि एक विशाल प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात दोन उंच दीपस्तंभ आहेत.

गणेशाची मुख्य मूर्ती पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या मस्तकावर आणि बेंबीत हिरा आणि डोळ्यांमध्ये माणके जडविली आहेत.

विघ्नेश्वर देवस्थानात भाद्रपद आणि माघ महिन्यात उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला उत्सव आणि विशेष पूजा-अर्चा केली जाते. कार्तिक पौर्णिमेला दोन्ही दीपस्तंभ शेकडो दिव्यांनी उजळले जातात.

महागणपती देवस्थान

पुणे-नगर महामार्गावर पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर रांजणगाव येथे श्री महागणपती देवस्थान आहे.

सध्या असलेले मन्दिर पेशव्यांनी बांधले. या पूर्वाभिमुख मंदिराला सुंदर आणि भव्य प्रवेशद्वार आहे. मंदिराची बांधणी अशा प्रकारे केली आहे कि दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाच्या वेळी श्रींच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात.

श्रीमहागणपती मंदिरात चार मुख्य उत्सव होतात. भाद्रपद चतुर्थी, माघ चतुर्थी, श्रावण महिना आणि फाल्गुन महिना. या शिवाय प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला विशेष पूजा-अर्चा केली जाते.

अष्टविनायक यात्रा

हे आठ गणपती महाराष्ट्रात आणि जगभरात अष्टविनायक या नावाने ओळखले जातात. अष्टविनायक यात्रा करण्यासाठी पुणे हे उत्तम ठिकाण आहे. पुण्याहून बऱ्याच खाजगी कंपन्या दोन किंवा तीन दिवसात या सर्व मंदिराची यात्रा घडवतात.

जर दोन दिवसांची यात्रा केली तर एका दिवसात चार गणपती करून रात्री पुण्याला परतून तेथे रात्री मुक्काम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी उर्वरित चार गणपती केले जातात. काही यात्रा कंपन्या ओझर किंवा लेण्याद्री ला रात्री मुक्काम करतात.

तीन दिवसांच्या यात्रेत लोणावळा-खंडाळा येथे ही फिरवले जाते.

यात्रेसाठी जो शुल्क आकारला जातो त्यात प्रवास भाडे, टोल, आणि पार्किंग भाडे याचा समावेश असतो. जेवण आणि राहण्यासाठी वेगळा पैसा घेतला जातो. 

phone